नाशिक : मातीला आकार देणारे कुशल हात आणि कॅनव्हॉसवर लीलया फिरणाऱ्या ब्रशने व्यक्तिचित्र आणि शिल्पांचा जिवंत कलाविष्कारनाशिककरांनी रविवारी अनुभवला. समोरील सजीव मॉडेलची विविध कोणातून साकारलेल्या कलाकृतीने कलावंतांची प्रतिभा अधिकच बहरली. निमित्त होतं जगप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार मायकेल अॅँजोलो यांच्या स्मृतिदिनाचे.पोट्रेट आर्टिस्ट ग्रुप मुंबई व नाशिक आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य संकुल येथे या कलासोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकसह महाराष्टÑातून आलेल्या २८ चित्रकार व शिल्पकारांनी प्रत्यक्ष मॉडेलवरून लाईव्ह व्यक्ती आणि शिल्पचित्रे एकाचवेळी साकारून नाशिककरांची मने जिंकली. या विनामूल्य स्पर्धेसाठी नाशिकसह औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, पुणे, मुंबई, अमरावती येथील स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी जलरंग, तैलरंग, अॅक्रेलिक कलर्स, आॅइल पेंट्स माध्यमातून प्रत्यक्ष मॉडेलवरून व्यक्तिचित्रे साकारली.शिल्प कलाकारांनीदेखील अत्यंत कौशल्यपूर्ण आणि एकाग्रतेने शिल्पे साकारली. शाडूच्या मातीतून आठ शिल्पकारांनी प्रत्यक्ष व्यक्तिशिल्पे साकारली. लाईव्ह व्यक्तिचित्रण व शिल्प निर्मितीचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यत कलात्मक जडणघडण उपस्थित नाशिककरांनी आणि कलावंतांनीही अनुभवली. स्पर्धेचा हा पहिला टप्पा असून, यातील विजेत्या स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.