नाशिक : नवीन वर्षाचे स्वागत करताना अर्थात थर्टी फर्स्टला मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या १०९ तळीरामांवर शहर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली़ विशेष म्हणजे गतवर्षी केवळ ३१ तळीरामांवर कारवाई करण्यात आली होती़ तर यावर्षी कारवाईमध्ये तिपटीने वाढ झाली असून गत दोन वर्षातील ही सर्वाधिक कारवाई आहे़नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील ४१ ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत सुमारे शंभराहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली़ रविवारी सुटीचा दिवस असल्याने थर्टी फर्स्ट जोरात साजरा केला जाणार असा अंदाज होता़ मात्र दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट होता तर सायंकाळनंतर तरुणाई तसेच नागरिक सेलीब्रेशनसाठी घराबाहेर पडले़ शहरातील बड्या हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होते़ तर दुसरीकडे मद्यप्राशन करीत वाहन चालवून स्वत: तसेच इतरांच्या अपघातास कारणीभूत ठरू नका असा संदेश पोलिसांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिला होता़गंगापूररोड, शरणपूररोड, कॉलेजरोड, आनंदवली रस्ता, मखमलाबाद-आनंदवली गोदाकाठ रस्ता, मुंबई नाका, द्वारका, इंदिरानगर अशा शहरातील जवळपास सर्वच परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रत्येक चौकांमध्ये तसेच सिग्नलवर पोलीस कर्मचाºयांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. वाहतूक पोलिसांच्या ४२ ठिकाणच्या नाकाबंदीत दुचाकीधारकांची ‘ब्रेथ अॅनालाईजर’ ने तपासणी केली असता त्यामध्ये १०९ जण मद्यप्राशन करून वाहन चालवितांना आढळून आले़ त्यांच्यावर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हनुसार कारवाई करण्यात आली़
थर्टीफर्स्टला नाशकात १०९ तळीरामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:58 PM