नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवनात असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराजवळ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकून मंगळवारी (दि.१२) दुपारी एका आयशर ट्रकमधून ३५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. पोलिसांनी जप्त केलेला गांजा व ट्रक असे दोन्ही मिळून सुमारे पन्नास लाखांचा हा ऐवज आहे . याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पंचवटीतील तपोवन परिसरात चोरी छुप्या मार्गाने गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार दुपारी तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मीनारायण मंदिराजवळ एक आयशर (एमएच १२ इक्यू १४२९) हा संशयास्पदरीत्या उभा असल्याचे पोलिसांना दिसले़ त्यांनी आयशरचालकाकडे चौकशी करून आतमधील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. या गाजांचे वजन तब्बल ६७० किलो आहे़ पोलिसांनी आयशर ट्रकचालक व त्याचा साथीदार अशा दोघांना ताब्यात घेतले आहे़
पोलिसांनी जप्त केलेला गांजा व आयशर ट्रक यांची किमत सुमारे पन्नास लाख रुपये आहे़ दरम्यान, या गांजाची भद्रकाली, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ या परिसरात विक्री केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.