नाशिक : राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत असल्याने टीईटीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आत्तापर्यंत सुमारे दीड हजार टीईटीधारकांची नोंदणी करण्यात आली असून, अजूनही नोंदणीचा ओघ सुरूच आहे.राज्यात टीईटी झालेले हजारो शिक्षक असून, हे शिक्षक नोकरीपासून वंचित आहेत. टीईटी झाल्यानंतरही त्यांना नोकरीची हमी मिळाली नसल्याने या शिक्षकांना नोकरीची प्रतीक्षा आहेच. नोकरीच्या अपेक्षेने टीईटीधारक शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले असताना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पवित्र पोर्टलमध्ये स्व-प्रमाणपत्रांची नोंदणी बंधनकारक असल्याने त्यांची धावाधावा सुरू झाली आहे. विभागीय कार्यालयातच नोंदणीची व्यवस्था असल्याने विभागातील शिक्षक नाशिकमधील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत.राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांची नोंदणी सुरू केलेली आहे. त्याअंतर्गत २१ जानेवारीपासून पवित्र पोर्टलमध्ये स्व-प्रमाणपत्राची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र यासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येण्याचे फर्मान दिल्याने चार जिल्ह्यांतील टीईटीधारकांना नाशिकमध्ये येऊन नोंदणी करावी लागत आहे. यामध्ये संपूर्ण दिवस जात असल्याने नाराजी निर्माण झाली आहे. गरजू बेरोजगारांना टीईटीधारक उसनवारी करून नाशिकमध्ये आल्याचे सांगितले जाते तर कुणी महिला तान्ह्या बाळाला घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोहचत आहेत.आतापर्यंत सुमारे १५००हून अधिक बेरोजगार शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातून स्व- प्रमाणपत्राची नोंद केली आहे. मात्र यासाठी लांबचा प्रवास करावा लागत असल्याने विभागीय पातळीवर नोंदणी न करता जिल्हा पातळीवर नोंदणीची व्यवस्था असावी, अशी मागणी या टीईटीधारकांनी केली आहे. परंतु ही नोंदणी जिल्हानिहाय ठेवली असती तर या उमेदवारांचा वेळ आणि पैसा वाचला असता. काही उमेदवार हे शनिवारपासून नाशिक शहरात आले होते. तर सोमवारी सकाळी सात वाजेपासूनच रांगेत उभे होते.
स्व-प्रमाणपत्र नोंदीसाठी टीईटीधारक रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 5:08 PM
नाशिक : राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक ...
ठळक मुद्देप्रदीर्घ प्रक्रिया : १५००हून अधिक बेरोजगारांची नोंद