नाशिक : सातपूर तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे़ शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने सातपूर परिसरात तर भद्रकाली पोलिसांनी तिगरानिया कंपनीजवळ अशा दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर रविवारी (दि़१३) सायंकाळी छापामारी करून नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून पाच हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़
सातपूरच्या नासर्डी नदीशेजारी कांबळेवाडी परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेश गवळी यांना मिळाली होती़ वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सायंकाळच्या सुमारास छापा टाकला असता संशयित विठ्ठल पोपट आहेर (३२, रा. बिल्डिंग बी, सातपूर आयटीआयच्या पाठीमागे, यमुनानगर, कामटवाडे, नाशिक) हा तीन साथीदारांनासमवेत पत्त्यावर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या चौघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २ हजार ९८० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ या चौघा संशयितांवर सातपूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
द्वारकाजवळील तिगरानिया कंपनीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार रविवारी सायंकाळच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला़ यावेळी संशयित रामराव मारुती नरवाडे (४२, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, माणेकशानगर, काठे गल्ली, नाशिक) व त्याचे इतर चार साथीदार पत्त्यांच्या कॅटवर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २ हजार १०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ पोलीस नाईक राजेंद्र काळोगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़