नाशिक : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे जुलै-ऑगस्टमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होत असते. परंतु आता लस घेतल्याशिवाय त्यांना परवानगी दिली जाणार नसल्याने अशा परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत ५८५ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातून परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. काही प्रथमच परदेशात जाणार आहेत तर काही विद्यार्थी सुटीत नाशिकमध्ये आले होते, मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे त्यांना परदेशात जाता आले नव्हते. अशा विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लसीचे संरक्षण देण्यात आले आहे. परदेशात या लसीला मान्यता देण्यात आलेली असल्यामुळे अशी लस घेणाऱ्यांना पुढील डोस परदेशातदेखील मिळणार आहे.जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत नाशिक शहर आणि जिल्ह्यातील एकूण ५८५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्वत्र लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. ज्यांनी लसींचे डोस घेतले आहेत अशांनाच केवळ देशात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्यांना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कालिदास कलामंदिर येथे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविली.परदेशात जाणाऱ्यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तेथील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यांचे शैक्षणिक सत्र पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.