नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून महाविद्यालयीन तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला जात असून, महाविद्यालयांमध्ये ‘सेल्फी पॉइंट’ सुरू करण्यात आले आहेत. ‘वोट कर नाशिककर’ असे घोषवाक्य असलेल्या सेल्फीच्या माध्यमातून तरुण आपल्या मित्र-मैत्रिणींना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत.तरुणाईमध्ये असलेल्या सेल्फीची क्रेझ लक्षात घेता जिल्हा निवडणूक शाखेने शहरातील दहा महाविद्यालयांमध्ये सेल्फीपाइंट तयार केले आहेत. या ठिकाणी तरु णांना ‘मतदानाचा हक्क बजवा’ असा संदेश असलेल्या ठिकाणी सेल्फीकाढू देता येणार आहे. सदर सेल्फी शेअर करून मतदानासाठी जनमत अनुकूल करण्याची ही मोहीम परिणामकारक ठरत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत व्यापक जनजागृती केल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला होता. नाशिक लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच ६० टक्के मतदान झाले होते. त्यापार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार केला जात आहे. जिल्हा प्रशासनाला पुरेसा वेळ मिळाल्याने जिल्ह्यात मतदानासाठी अचूक मतदारयादी आणि जनजागृती करण्यात आलेली आहे.
मतांचा टक्का वाढविण्यासाठी ‘वोट कर नाशिककर’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 7:40 PM