नाशिक : त्र्यंबकेश्वर - जव्हार मार्गावरील वाघेरे फाट्यावर भरधाव ट्रकने समोरून येणा-या फोर्स कंपनीच्या गामा या प्रवासी वाहनास दिलेल्या धडकेत १३ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ यामध्ये प्रवासी गामा वाहनाचा चक्काचूर झाला असून जखमी प्रवाशांच्या डोक्यास जबर मार लागला आहे़ या जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून प्रथम त्र्यंबकेशवर उपजिल्हा व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून चालक गंभीर जखमी आहे़ दरम्यान, हरसूल पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे़
हरसूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबापैकी वटकपाडा येथील पंधराहून अधिक प्रवाशांनी गिरणारे येथील देवीचे दर्शन घेऊन फोर्स कंपनीचे क्रुझर गामा वाहनाने (एमएच २० एवाय ७५०४) या वाहनाने वटकपाड्याकडे जात होते़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वाघेरा फाट्याजवळ समोरून भरधाव आलेल्या ट्रकने क्रुझर वाहनास जोरदार धडक दिली व सुमारे पन्नास ते शंभर फुटावरील शेतात घुसला़ तर क्रुझर वाहनाची चालकाकडील बाजूस धडक बसल्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या संरक्षक लोखंडी पोलला घासत गेली़ या भिषण अपघातात १३ प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये सहा महिला व दोन चिमुकल्यांचा समावेश आहे़ जखमींपैकी लक्ष्मण गिरे या गंभीर जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़
या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेस संपर्क करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़ जिल्हा रुग्णालयात तातडीने या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले़ तर गंभीर जखमी असलेले लक्ष्मण गिरे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ जखमीपैकी सात महिने व पाच वर्षीय बालकास अधिपरिचारिकांनी कृत्रिम आॅक्सिजन लावून त्यांच प्राण वाचविले आहेत़ पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले असून हरसूल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान, हरसुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक घुगे तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य हिरामण खोसकर हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते़अपघातातील जखमी
मीराबाई किसन लाखन (४५), चालक किसन सखाराम लाखन (४८), राहुल किसन लाखन (१३), रवीराज किसन लाखन (७ महिने), भीका चिमण गभाले (४५), यमुनाबाई भीका गभाले (४४), महेंद्र नामदेव लोखंडे (२९, रा. काकडवळण), गंगुबाई नामदेव लोखंडे (४५, रा. काकडवळण), निर्मलाबाई जनार्दन बुधर (२५), संगीता तुळशीराम वारणे (३६), पार्वताबाई संजय जाधव (२३), पिंट्या उर्फ श्रेयस जनार्दन बुधर (वर्षे महिने) हे जखमी आहेत तर लक्ष्मण सोनू गि-हे (३३) हो गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.