नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरलेला गेलेल्या श्री निवृत्तीनाथ पालखीचा परतीचा सोहळा गडकरी चौकातील शासकीय गुदाम परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी पालखी सोबत असलेले वारकरी, टाळ,पखवाज वादक यांचा राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरहून निघणाऱ्या श्री संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात जल्लोषात स्वागत केले जाते. परंतु परतीच्या पालखीकडे फारसे कुणीचेही लक्ष नसते. शहरातील राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाने जाणिवपुर्वक परतीच्या पालखीच्या स्वागतचा सोहळा केला आणि नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे स्वरूप मोठे नसले तरी पंढरपूरहून परततांना आपल्या वारकºयांचा यथायोग्य सन्मान झाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथसिंग परदेशी यांनी सांगितले.जुने नाशिक पररिसरातील राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाने गेल्या तीन वर्षांपासून परतीच्या पालखी सोहळ्यातील वारकºयांचा सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. अगदी पाच ते दहा मिनिटांचा हा कार्यक्रम कुणाच्याही नजरेत भरणारा नसला तरी भजनी मंडळाने कार्यक्रमाच्या भव्यतेचा विचार न करता आपली भावना व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. अगदी हार-तुरे आणि शाल इतका मर्यादीत हा कार्यक्रम असल्याने त्यांच्या या उपक्रमाचे देखील कौतुक होत आहे.त्र्यंबकेश्वरहून पालखी निघते तेव्हा पंढरपूरपर्यंत लाखो भाविक श्री निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात सहभागी होतात. परतीच्या प्रवासात वारकरी आपापल्या गावी निघून जातात. त्र्यंबकेश्वरपर्यंत अवघे दोन अडीच हजार वारकरी त्र्यंबकेश्वरी परततात. या वारकºयांचे गडकरी चौकातील शासकीय गुदामाशेजारील छोट्याशा मोकळ्या जागेत स्वागत करण्यात आले. टाळ, पखवाज, वीणा, श्री स्वामी समर्थ बॅण्ड, सनई पार्टी अशा वारकºयांचा भजनी मंडळाकडून सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय भालेनाथ भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, कॉलेज कॅम्पस फ्रेण्ड सर्कल, विठ्ठल रुक्मिणी मंदिर चव्हाटा, श्री स्वामी समर्थ मंदिर कुंभारवाडा, संत गाडगे महाराज दत्त मंदिर, महिला भजनी मंडळ, काशीनाथ वेराळे, लक्ष्मण बोरसे, रघुनाथ सोनवणे, संजय सोनवणे, दत्ता सोनवणे, हभप सोनू विनोद सोनवणे, सुरेखा चक्रवर्ती, रेखा प्रल्हाद सोनवणे, अश्विनी सारंग सोनवणे, विनोद सोनवणे, दिलीप बिडवई, अनंत बिडवई, अविनाश कडवे, लक्ष्मण बोरसे यांचे सहकार्य लाभले आहे.