नाशिक : कौटुंबिक वादातून विवाहाच्या पहिल्याच वाढदिवशी गर्भवती पत्नीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून खून करून फरार झालेल्या संशयित पती सारीपुत्र पुंजाराम शिंदे यास अंबड पोलिसांनी सिडकोतील त्याच्या घरातून अटक केली आहे़
सिडकोच्या पंडीतनगरमधील रहिवासी सारीपुत्र पुंजाराम शिंदे (२५, मूळ रा़ निखाडे, ता.जि़परभणी) हा दोन महिन्यांपुर्वीच पत्नी रमासोबत राहण्यासाठी आला होता़ बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या सारीपुत्र शिंदेसमवेत त्यांचे आई, वडील व भाऊ असे सर्व एकत्रित राहत होते़ वर्षभरापुर्वी विवाह झालेल्या सारीपुत्र व त्याची पत्नी रमा यांच्यामध्ये गुरुवारी (दि़ ३) दुपारी भांडण झाले़ व यानंतर संतप्त सारीपुत्र याने घरातील भाजी कापण्याच्या सुरीने पत्नी रमा हिच्या गळ्यावर व पोटावर वार करून तिचा खून केला़
या घटनेनंतर फरार झालेल्या सारीपुत्राच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके पाठविली होती़ मात्र, तो घरी आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळताच त्याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष खडके, पोलिस उपनिरीक्षक राकेश शेवाळे, मिथुन म्हात्रे, विजय पवार यांनी त्यास अटक केली़