नाशिक : औरंगाबादला जाणारी एसटी कुठे मिळेल असे विचारून दोघा संशयितांनी एका महिलेस रिक्षामध्ये बसवून भूरळ पाडून तिच्या अंगावरील सत्तर हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२६) दुपारी ठक्कर बझार बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी कल्पना देवीदास करोटे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी चोरी गुन्हा दाखल केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकालीतील मोची गल्लीतील रहिवासी कल्पना करोटे (५०) या दुपारी दोन वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात होत्या़ नेहरू गार्डनजवळील मर्चंट्स बँकेजवळ त्यांना दोन संशयित भेटले व औरंगाबादसाठी एसटी कुठून मिळेल अशी विचारणा केली़ करोटे यांनी त्यांना रिक्षाने जाण्याचा सल्लाही दिला; मात्र या संशयितांनी भुरळ पाडून करोटे यांना रिक्षात बसविले व ठक्कर बझार बसस्टॅण्डवर आणले़
यानंतर संशयितांनी करोटे यांना अंगावर इतके दागिने घालायचे नाहीत, चोर कान आणि गळा कापतात अशी भीती दाखविली़ त्यामुळे संशयितांवर विश्वास बसलेल्या कपोते यांनी अंगावरील ४० हजार रुपयांची दीड तोळे वजनाची सोन्याची पोत, दहा हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे टॉप्स, अर्धा तोळा वजनाचे कानातील वेल, दहा हजार रुपयांची अर्धा तोळा वजनाची अंगठी असे सत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून संशयितांकडे दिले़ त्यांनी दागिने रुमालात बांधून पर्समध्ये ठेवण्याचे नाटक केले व फरार झाले़ दरम्यान, काही वेळाने करोटे यांनी रुमालाची गाठ सोडून बघितली असता त्यामध्ये दागिन्यांऐवजी दगड व कागद असल्याचे आढळून आले़
या घटनेची माहिती मिळल्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़