नाशिक : सातपूरच्या श्रीराम फायनान्स कंपनीची एजन्सी घेऊन काम करणाऱ्या आत्महत्येप्रकरणी कंपनीत काम करणा-या विवाहितेविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ मयूरी संदीप घावटे (रा़ तारवालानगर, पंचवटी) असे गुन्हा दाखल केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ श्रीराम फायनान्स कंपनीची फ्रेंचाईजी काम करणा-या स्वप्नील पुंड यांनी या विवाहितेच्या पतीस व्यवसायासाठी दहा लाख रुपये दिले होते़ मात्र, हे पैसे परत न करता विवाहितेने पुंड यांना पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. तसेच सततच्या मानसिक छळास कंटाळून पुंड यांनी शुक्रवारी (दि़१८) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
सातपूर पोलीस ठाण्यात सागर पुंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊ स्वप्नील पुंड याने कार्यालयात कामास असलेली विवाहिता मयूरी घावटे हिचा पती संदीप घावटे यास व्यवसायासाठी दहा लाख रुपये दिले होते़ अनेक महिन्यांपासून भाऊ घावटे यांना दिलेल्या पैशाची मागणी करीत होता़ मात्र, मयूरी घावटे हीने घेतलेले पैसे परत न करता याउलट भावाविरोधातच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन मानसिक छळ करीत होती़ या छळाला कंटाळून भावाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
या प्रकरणी सातपूर पोलिसांनी विवाहितेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़