नाशिक: गेल्या महिन्यात सुरू झालेल्या जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीला राज्यात सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळूनही या भरतीला मुदवाढ देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मेगा भरतीप्रक्रियेला दिड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात येऊन सात दिवसांची मुदत वाढविण्यात आली आहे.शासनाच्या ग्रामविकास विभागाने महापरिक्षा पोर्टलव्दारे मेगा भरती सुरु केली आहे. याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पेसा व नॉन पेसा क्षेत्रासाठी ३ मार्च रोजी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जाहीरात प्रसिध्द केली होती. यात ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, वरीष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक अशा विविध पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रि येसाठी आॅनलाइन पध्दतीने अर्ज करण्यासाठी १६ एप्रील ही अंतिम मुदत होती. ही मुदत वाढवून मिळावी यासाठी अनेक उमेदवारांनी ग्रामविकास विभागाकडे मागणी केली होती.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील भरती प्रक्रि येला सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. अनेक उमेदवारांनी मुदतवाढ मिळण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे मागणी केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना आता २३ एप्रील पर्यंत रात्री ११.५९ पर्यंत आॅनलाइन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपुर्वीच आॅनलाइन पध्दतीने अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.
जिल्हा परिषदेच्या भरतीस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 6:17 PM