नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाऱ्या वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या असल्याने वाहने आत आणण्यासाठी सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना बसला आहे.जिल्हा परिषद आवारात पार्किंगला पुरेशी जागा नसल्याने आणि दिवसभरात अनेक वाहने येथे उभी केली जात असल्याने जिल्हा परिषदेच्या मार्गात वाहन कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, राजकीय नेते, माजी सदस्य तसेच ठेकेदारांची वाहने जिल्हा परिषद आवारात आणली जातात. त्यामुळे सदर वाहने आत आणणे आणि बाहेर घेऊन जाणे यामुळे वाहनकोंडीचा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाला सर्वांनाच मदत करावी लागत असल्याने आलेल्या वाहनांना आत घेण्यापासून बाहेर जाण्यासाठी मदतही करावी लागते. त्यातच अनेक कर्मचारी हे आपली दुचाकी मुख्य इमारतीच्या मागील बाजूस उभी करतात. त्यामुळे त्यांना या चारचाकी वाहनांतूनही दुचाकी काढणे कठीण होते. यातून अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात.या प्रकारामुळे ‘जिल्हा परिषद आवार की वाहनतळ’ असा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी खासगी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
नाशिक जिल्हा परिषद आवारात ‘वाहनबंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 8:59 PM