- सुयोग जोशी नाशिक - राज्यातील पहिल्या वातानुकुलित बसस्थानकाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता सिंहस्थ कामांना गती मिळणार असून सद्यस्थितीत महापालिकेकडून ११ हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु फडणवीस यांच्या घोषणेनंतर सर्वच विभाग सजग झाले आहेत.शनिवारी फडणवीस वातानुकुलित बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी शहरात आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, येत्या २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा आताच तयार करून पाठविल्यास जुलैमधील अर्थसंकल्पातच त्यासाठी तरतूद करण्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला. नाशिक व त्र्यंबकच्या सिंहस्थासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे यंत्रणा अलर्ट झाली असून आराखड्याबाबत लवकरात लवकर नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या विकासासाठी पर्वणी ठरतो.
बारावर्षांचा शहराच्या विकासाचा बॅकलाॅग भरुन काढतो. सन २०२७- २८ मध्ये कुंभमेळा होणार असून तयारीसाठी अवघे तीन वर्ष उरले आहे. दुसरीकडे मनपाच्या सर्व विभागांनी स्वत:च्या स्तरावर कुंभमेळा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात हा आराखडा आठ हजार कोटींच्या घरात होता. पण अंतर्गत रिंगरोड, मिसिंग लिंक, जुन्या रिंगरोडचे रुदिकरण यासाठी भूसंपादन करावे लागणार असून त्यासाठी तीन हजार कोटींची गरज अपेक्षित होती. सद्यस्थितीत विकासकामांची जंत्री पाहता सिंहस्थ आराखडा अकरा हजार कोटींवर गेला आहे. फडणविस यांच्या घोषणेनंतर आता शासन किती निधीची तरतूद करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.