नाशिक : सराईत गुन्हेगार निखिल ऊर्फ बाल्या मोरे याच्या खुनातील संशयित रोशन पगारे याच्या भावावर धारदार शस्त्राने वार करून तसेच डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.४) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास म्हसरूळ शिवारातील गणेशनगर परिसरात घडली़ भूषण जयवंत पगारे (२९) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे़ विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच भूषण याच्यावर संशयितांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. दरम्यान, गंभीर जखमी भूषण पगारे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी सराईत गुन्हेगार निखिल मोरेचा कलानगर येथे पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात संशयित आरोपी रोशन पगारे याचा सहभाग असल्याच्या कारणावरून संशयितांनी पगारे याचा भाऊ भूषण याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. शनिवारी (दि.४) सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी पगारे यास दुकानाबाहेर बोलावले़ त्यानंतर संशयित व त्यांच्या अन्य साथीदारांनी पगारे याच्या दोन्ही हातावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात दगड घालून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत पगारे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांना तीन ते चार संशयित आरोपींची नावे मिळाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़