नाशिक : काश्मीरच्या बांदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी (दि़ ११) पहाटे सुरक्षा पथके व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत़ त्यात एक शहीद जवान महाराष्ट्राचे सुपुत्र असून, त्यांचे नाव मिलिंद (रिंकू) किशोर खैरनार (३४, मूळ राहणार रनाळे, ता. शहादा, जि.नंदुरबार) आहे़ सद्यस्थितीत खैरनार यांचे कुटुंबीय नाशिक-दिंडोरी रोडवरील स्नेहनगरमधील श्रीगणेश प्लाझा येथे राहतात़बांदीपोरामधील हाजीन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष उडाला. यावेळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिले. लष्कराच्या गोळीबारानंतर पळालेले दहशतवादी एका घरात लपून बसले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च आॅपरेशनवेळी घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रतिउत्तर दिले. त्यात दोन्ही दहशतवादी ठार झाले. परंतु या संघर्षात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले.शहीद जवान मिलिंद किशोर खैरनार यांचे वडील किशोर सदाशिव खैरनार यांचे मूळ गाव रनाळे, ता. शहादा, जि. नंदुरबार हे आहे. वीज महामंडळातील नोकरीमुळे ते साक्री, जि. धुळे येथे स्थायिक झाले होते. त्यानंतर ते नाशिकला स्नेहनगरमध्ये स्थायिक झाले आहेत. शहीद जवान मिलिंद (वय ३४) यांच्या पत्नीचे नाव हर्षदा असून, त्यांना वेदिका (५) मोठी मुलगी व मुलगा कृष्णा (२) अशी दोन अपत्ये आहेत. जवान मिलिंद तीन वर्षांनंतर सैन्यातून निवृत्त होणार होते. मिलिंदचा मोठा भाऊ मनोज खैरनार हाही मुंबई पोलिसात जवान आहे.शहीद मिलिंद खैरनार यांचे बालपण साक्री आणि धुळे येथे गेले. ते धुळ्यात आपल्या मामांकडे शिक्षणासाठी होते. येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते भारतीय लष्करात भरती झाले होते. त्यांचे कुटुंबीय म्हसरूळ-दिंडोरी रोडवरील स्नेहमधील श्रीगणेश प्लाझा येथे राहात आहेत़ दरम्यान, मिलिंद खैरनार यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या नातेवाइकांनी नाशिकच्या स्नेहनगरमध्ये गर्दी केली.मूळगावी होणार अंत्यसंस्कारशहिद जवान मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर गुरुवार, १२ आॅक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता बोराळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठीची तयारी प्रशासनातर्फे पुर्ण करण्यात येत आहे. रात्री उशीरापर्यंत तहसीलदार नितीन पाटील यांच्यासह महसूलचे अधिकारी तेथे थाबून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक विठ्ठल मोहोकर हे देखील ठाण मांडून होते.दरम्यान, बुधवारी रात्री नऊ वाजता पालकमंत्री जयकुमार रावल यांनी बोराळे येथे भेट देवून शहिद जवानाच्या कुटूबिंयांचे सांत्वन केले.
ओझरला पार्थिव येणार
शहीद मिलिंद यांचे पार्थिव गुरुवारी (दि. १२) नाशिकच्या ओझर विमानतळावर आणण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथे ते नेण्यात येणार आहे. तेथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.