नाशिक : संगीतात जसे घराणे असते, तसेच नाशिक हे निसर्गचित्रणाचे माहेरघर असून, दिवंगत चित्रकार शिवाजीराव तुपे यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकले, असे गौरवोद्गार गणपत भडके यांनी काढले.ज्येष्ठ चित्रकार शिवाजीराव तुपे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘रंगोत्सव’ या प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी भडके बोलत होते. नेहरू चौकातील सोनारवाड्यात हा कार्यक्रम झाला. स्पर्धेत औरंगाबाद, पुणे, ठाणे, मुंबईसह राज्यभरातून ८५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजता नोंदणी करण्यात आली. शहरातील गल्ल्या, घाटांवर जाऊन कोणत्याही माध्यमात चित्र साकारण्याची स्पर्धा घेण्यात आली. सर्व स्पर्धकांची चित्रे जमा झाल्यावर भडके यांनी परीक्षण केले व विजेते घोषित केले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. रोख रक्कम व प्रमाणपत्रांनी विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, दिलीप साळगावकर, ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, प्रा. बाळ नगरकर, किरण पाटील आदिंची उपस्थिती होती. धनंजय गोवर्धने यांनी प्रास्ताविक केले. अशोक ढिवरे यांनी परिचय करून दिला. मुक्ता बालिगा यांनी आभार मानले.
निसर्गचित्रणाचे नाशिक माहेरघर
By admin | Published: December 13, 2015 11:29 PM