नाशिक : सुमारे तीनशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी नाशिक साखर कारखाना व निफाड साखर कारखाना विक्रीचा निर्णय घेणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने आता कारखाने विक्रीला येत असलेल्या अडचणी पाहून, दीर्घकालीन करारावर हे दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी (दि.१६) एका राज्यस्तरीय व राष्ट्रीय वृत्तपत्रात जिल्हा बॅँकेने निविदा मागविल्या आहेत. त्यानुसार मंगळवार (दि.१७ ) पासून ३ नोव्हेंबर दरम्यान दोन्ही कारखान्यांच्या विक्रीसाठी आणि भाडेतत्त्वावर देण्यासाठी या निविदा मागविण्यात आल्या आहेत. नाशिक सहकारी साखर कारखाना २५ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यासाठी संबंधितांकडून ४० टक्के रक्कम पहिल्या दहा वर्षांसाठी म्हणजेच ५४ कोटी ७८ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यासाठी बयाणा रक्कमही ५ कोटी ४८ लाख ठेवण्यात आली आहे, तर निफाड सहकारी कारखाना २५ वर्षाच्या भाडे तत्त्वावर देण्यासाठी पहिल्या दहा वर्षांसाठी ५८ कोटी ९९ लाख रुपये व बयाणा रक्कम म्हणून ५ कोटी ९० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या ७ नोव्हेंबरला या भाडेकराराच्या निविदा उघडण्यात येणार आहेत. तर संपूर्ण विक्रीसाठी दिलेल्या निविदा ८ नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार आहेत. नाशिक सहकारी साखर कारखान्याकडे ३० सप्टेंबर २०१७ अखेर जिल्हा बॅँकेची एकूण थकबाकी १३६ कोटी ९६ लाख ३३ हजार असून, निफाड साखर कारखान्याकडे १६६ कोटी ३९ लाख ५९ हजार रुपये थकबाकी आहे.
नाशिक, निफाड साखर कारखाना भाडेतत्त्वावर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:41 AM