नाशिक : केरळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या नेमबाजांनी वैयक्तिक आणि सांघिक गटात उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्राच्या पदतालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली. नेमबाजांनी एकूण चार पदकांची कमाई केली, त्यामध्ये दोन वैयक्तिक आणि दोन सांघिक पदकांचा समावेश आहे. थ्री पोझिशन रायफल प्रकारात स्वप्नील कुसळे याने वैयक्तिक रौप्यपदक पटकाविले, तर पंकज देसाई यांनी महाराष्ट्राच्या चमूकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी बजावली. अक्षय अष्टपुत्रे याने या स्पर्धेत सांघिक गटात कांस्यपदक पटकाविले. २५ मीटर रॅपिड फायर गटात अक्षय याने गेल्या दोन हंगामापासून उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. त्याने सैन्य आणि नेव्ही जवानांना पिछाडीवर टाकत पदक पटकाविले होते. केरळ येथील स्पर्धेत सांघिक गटात त्याने रॅपिड फायर प्रकारात कांस्यपदक मिळविले. श्रद्धा नलमवार आणि श्रद्धा गावंडे यांनी महाराष्ट्राच्या सांघिक संघाकडून खेळताना सुवर्णपदक पटकाविले, तर श्रद्धा हिने २५ मीटर पिस्टल प्रकारात वैयक्तिक कांस्य आणि संघासाठी सुवर्णपदक पटकाविले. प्रशिक्षक भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली हे नेमबाज नाशिक जिल्हा शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन आॅफ नाशिकच्या रेंजवर सराव करीत आहे. संघटनेच्या अध्यक्ष शर्वरी लथ आणि सचिव मोनाली गोरे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकचे नेमबाज चमकले
By admin | Published: February 10, 2015 1:07 AM