नाशिक : गेल्या महिन्यात दोनदा चाळिशीपार पोहचलेला कमाल तपमानाचा पारा बुधवारी (दि.९) पुन्हा चाळिशीवर पोहचला. त्यामुळे बुधवारी नाशिककरांनी शहर तापल्याचा अनुभव घेतला.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तपमानाचा पारा ३६ ते ३९ अंशांच्या जवळपास राहिला; मात्र नवव्या दिवशी तपमानाचा पारा अधिक चढला. तपमान चाळिशीवर पोहचल्याने बुधवारी नाशिककरांच्या जिवाची काहिली झाली. उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना अनुभवयास आल्या. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याचे अंगाला चटका बसत होता. दुपारी कडक उन्हामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. चालू आठवड्यात रविवारी ३९.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले तर या महिन्याच्या पहिला दिवशी पारा ३७ अंशांवर होता. चार दिवस सलग तपमानाचा पारा ३८ अंशांवर स्थिरावला मात्र बुधवारी थेट चाळिशीच्या पुढे एक अंशाने सरकला. किमान तपमान २०.६ इतके नोंदविले गेल्याने नाशिककरांना रात्रीदेखील वातावरणात उष्मा जाणवत होता.
सकाळपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा दुपारी अधिक तीव्र झाल्या होत्या. दिवसभर वाºयाचा वेगही कमी राहिल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिकांनी वातानुकूलित यंत्रे, पंखे, कुलरच्या वापरावर अधिकाधिक भर दिला. तसेच शीतपेयांसह टरबूज, ताक, लिंबू सरबत, उसाचा रस, लस्सी यांसारख्या शीतपेयांचा आधार घेत शरीराला दिलासा दिला.उन्हाळी सुटी सुरू असल्यामुळे बालगोपाळांनी दिवसभर जाणवलेला उकाडा व त्यामुळे आलेला शीण संध्याकाळी शहरातील उद्यानांमध्ये घालविण्याचा प्रयत्न केला. थंड हवा आणि आल्हाददायक वातावरणासाठी छोट्या मित्रांनी आपल्या पालकांसमवेत शहर व परिसरातील उद्यानांसह उपनगरीय भागांमधील उद्यानांमध्ये गर्दी केली होती. वाढत्या उन्हाने नाशिककर हैराण होत असून, यावर्षी उन्हाचा अधिक चटका नाशिककरांना जाणवत आहे.शहराचे कमाल तपमान असे...मंगळवार (दि.१) - ३७.९बुधवार (दि.२) ३८.०गुरुवार (दि.३) ३८.०शुक्रवार (दि.४) - ३८.०शनिवार (दि.५) - ३८.७रविवार (दि.६)- ३९.३सोमवार (दि.७)- ३७.०मंगळवार (दि.८)- ३८.१बुधवार (दि.९) - ४०.१