नाशिक : ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थराज्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील हे अनेकदा नाशिकला आले होते. त्यांच्या हस्ते अनेक कामांचे लोकार्पण करण्यात आले. नाशिकच्या प्रेस कामगारांचा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या विखे यांना प्रेसच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव होता अशा अनेक आठवणींना नाशिककरांनी उजाळा दिला. बाळासाहेब विखे पाटील हे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते असले तरी सहकार तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर अर्थराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली तिही त्यांनी पार पाडली. त्यादरम्यान ते नाशिक जिल्ह्णात अनेकदा येऊन गेले. मनमाडजवळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियमच्या एका कार्यक्रमास ते हजर होते. मद्यार्कापासून गैसोहोल तयार करण्याच्या प्रकाल्पाचे उद््घाटन तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विखे पाटील उपस्थित होते. नाशिकच्या नोटप्रेसला अर्थमंत्री असतानाच त्यांनी भेट दिली होती. पे्रसला तब्बल पाच तास उपस्थित होते. नाशिकरोड येथील प्रेसमधील कामगारांचा प्रश्न सोडवण्यास भर दिला होता. मयत आणि अनफिट कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन खासदार उत्तमराव ढिकले यांच्या विनंतीवरून ते नाशिकला आले होते. त्यांनी हा विषय समजून घेतला. तसेच तो सोडविण्यासाठी दिल्ली येथे बैठकही बोलविली होती. दुर्दैवाने हा प्रश्न तेव्हा सुटला नाही, नाशिक भेटीतच त्यांनी नाशिकच्या प्रेसमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आणण्यासाठी त्यांनी नियोजन केले होते, असे कामगार नेते रामभाऊ जगताप यांनी सांगितले. तर नाशिकमध्ये मुंबई नाका येथे पुलाचे विस्तारीकरण आणि सर्व्हीसरोडच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते आले होते. त्यावेळी या प्रभागाचे नगरसेवक वसंत गिते होते आणि महापौर कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव होत्या. तसेच त्यानंतर झालेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी जिल्ह्णात १२ ठिकाणी जाहीर सभा घेतल्या, एका दिवशी हेलीकॉप्टरने प्रवास करून त्यांनी या सभा न थकता घेतल्याची आठवण सुनील बागुल यांनी व्यक्त केली. याशिवाय मखमलाबाद येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी विखेपाटील उपस्थित होते. खासदार आनंदरराव अडसूळ आणि खासदार उत्तमराव ढिकले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संचयनीमध्ये नाशिकमधील शेकडो नागरिकांची गुंतवणूक फसल्यानंतर त्यावेळी या गुंतवणूकदारांच्या आंदोलनाची भेट घेण्यासाठीही ते आले होते, अशा अनेक आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
नाशिककरांनी दिला विखेंच्या आठवणींना उजाळा
By admin | Published: December 31, 2016 1:24 AM