नाशिक : पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित ‘नाशिक 21 के’ या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत आर्टिलरी सेंटरचा जवान शंकरलाल स्वामी याने १ तास ९ मिनिटे ५८ सेकंदाची वेळ नोंदवून विजेतेपद पटकाविले, तर महिलांमध्ये मंजू सहाणी हिने बाजी मारली़ सकाळची आल्हाददायक हवा, पोलीस बॅण्डची सुमधूर गाणी व सोबत झुंबा डान्सचा जलवा अशा उत्साहपूर्ण वातावरणात हजारो नाशिककर रविवारी (दि़२८) आपल्या आरोग्यासाठी धावले़ सकाळी साडेसहा वाजता गोल्फ क्लब मैदानापासून या अर्धमॅरेथॉनला प्रारंभ झाला़ महापौर अशोक मुर्तडक, आमदार देवयानी फरांदे, अपूर्व हिरे, उपमहापौर गुरुमित बग्गा, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी २१ किलोमीटरच्या पुरुष व महिला गटातील स्पर्घेकांना हिरवा झेंडा दाखवला.सर्वप्रथम २१ किलोमीटरचे स्पर्धक, त्यानंतर अर्धा तासांच्या फरकाने १० कि़मी़चे पुरुष व महिला गट, ५ कि़मी़ व शेवटी ३ कि़मी़च्या स्पर्धकांना सोडण्यात आले़ या स्पर्धेपूर्वी मैदानावर सुरू असलेल्या झुंबा डान्सने उपस्थित स्पर्धकांचे मनोरंजन व वार्मअप केले़ या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी तसेच आर्टिलरी सेंटरच्या जवानांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)
‘नाशिक २१ के’मध्ये धावले नाशिककर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 10:42 PM