नाशिक : वसंतोत्सवाच्या आगमनाची वर्दी देणारा, इंद्रधनुष्यी रंगांचे आपले जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारा रंगपंचमी सण साजरा करण्यासाठी नाशिककर रंग आणि रहाडींसह सज्ज झाले आहेत. मंगळवारी (दि.६) दुपारपासून आबालवृद्ध नाशिककर रंगोत्सवात तल्लीन झालेले पहायला मिळणार असून, त्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत कोरडे, ओले रंग, लहान-मोठ्या आकारातील वैविध्यपूर्ण पिचकाºया आदींच्या खरेदीची रेलचेल पहायला मिळाली. रंगपंचमीमुळे दुकाने बंद असण्याची शक्यता असल्याने श्रीखंड, गुलाबजाम, जिलबी अशी आवडीची मिठाईदेखील अनेक घरांमध्ये आगाऊ खरेदी करून ठेवण्यात आली. पेशवेकाळापासून नाशिककरांनी जोपासलेली रहाड संस्कृती यंदाही साजरी होणार असून, त्याचेही नियोजन व तयारी रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी पहायला मिळाली.पारंपरिक रहाडींबरोबरच शहरात सर्वत्र वैयक्तिक, सामूहिक स्वरूपात रंगपंचमी खेळली जाणार असून, त्यासाठी कोरडे, रासायनिक रंग, पिचकाºया, पाणी आदींची सिद्धता करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पाणीटंचाई असल्याने मर्यादित रंगोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे शहरातील पेशवेकालीन रहाडही खुली करण्यात आले नव्हते. यंदा मात्र सर्व रहाडी खुुली करण्यात आले आहेत. रंगपंचमीसाठी लागणारे रंग, लहान मुलांसाठी विविध आकारांच्या पिचकाºया आदींच्या खरेदीसाठी दुकानांवर ग्राहकांची लगबग रात्री उशिरापर्यंत दिसत होती. रंग खेळताना समोरचा दुखावला जाणार नाही, त्याला इजा होणार नाही आणि छोट्याशा खोडीतून मोठे भांडण, वादविवाद उद्भवणार नाही याची काळजी घेत रंगपंचमी खेळावी, असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले आहे. रंगपंचमी सण शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याने कायदा, सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी शहरात चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले असल्याचे पोलीससूत्रांकडून सांगण्यात आले. पाण्याच्या अपव्ययाबरोबरच त्वचाविकार टाळण्यासाठी रासायनिक रंगांऐवजी कोरडे रंग खेळण्यावर भर द्यावा, असा सल्ला पर्यावरणवाद्यांनी दिला आहे.
रंगपंचमीसाठी नाशिककर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:26 AM