नाशिक : मुंबईसह राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नाशिकमध्येही काही तासांत जोरदार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र शनिवारची रात्र आणि रविवारच्या संपूर्ण दिवसात पावसाची कृपा काही होऊ शकली नाही. आभाळ दाटून आल्याने जोरदार पावसाची अपेक्षा पल्लवित झाली असली तरी शहरात निव्वळ काही ठिकाणीच पावसाचा शिडकावा झाला. काळेकुट्ट आभाळ आणि गार वाऱ्यामुळे नाशिककरांनी गारठा अनुभवला. राज्यातील हवामानातील अंदाज सातत्याने फोल ठरत असतानाच शनिवारी मुंबईसह सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला. राज्यातील अनेक भागात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी पावसाने काही वेळ हजेरी लावल्यानंतर शनिवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे नाशिककरांना उकाडा सहन करावा लागला. मात्र, शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर नाशिककरांना कडाक्याचा गारवाही सहन करावा लागला. दुपारच्या सुमारास दाटून आलेले आभाळ आणि गार वाºयामुळे जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सायंकाळपर्यंत पावसाचा शिडकावा वगळता अपेक्षित पाऊस होऊ शकला नाही. हवामान खात्याने नाशिकला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नाशिककरांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.सायंकाळी सरींचा वर्षाव४सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्यामुळे संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता नागरिकांना वाटत होती. मात्र वरुणराजाने निराशा केली. सायंकाळी काही प्रमाणात हलक्या सरींचा वर्षाव शहरातील मध्यवर्ती भागात तसेच काही उपनगरांमध्ये झाला. सात वाजेपासून पावसाच्या हलक्या सरीचा वर्षाव सुरू झाला होता. रात्री आठ वाजेनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली. गेल्या शुक्रवारी (दि. २२) दिवसभरात ३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.गेल्या वर्षीचा जून समाधानकारकमागील वर्षी जून महिन्याअखेर २४९ मि.मी. इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान खात्याच्या केंद्राकडे आहे. मागील वर्षी २४ ते २५ जून रोजी २४ तासांत ५८ मि.मी. इतका हंगामातील उच्चांकी पाऊस झाला होता. २ जूनपासून शहरात पावसाची सुरुवात झाली होती. ३ ते ४ जून रोजी ५० मि.मी. पाऊस २४ तासांत नोंदविला गेला होता. यावर्षी जून महिन्यामध्ये वरुणराजाची समाधानकारक कृपादृष्टी अद्याप नाशिककरांवर झाली नाही. त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्पच राहिल्याचे दिसून येते. गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीतही घट होत असून, जलसाठा २४ टक्क्यांवर आला आहे. यावर्षी अद्याप ७७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. एकूणच शहरासह जिल्ह्याचे पर्जन्यमानाचे प्रमाण यावर्षी जून महिन्यात घटले आहे.
नाशिककरांचा रविवार कोरडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:51 AM