नाशिक- येथील इंदिरानगर अर्थात पूर्व प्रभागातील घंटागाडी ठेकेदार कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत नसून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हॅँडग्लोझ, मास्क, गमबुट, अॅप्रन अशा कोणत्याही आवश्यक गोष्टी पुरवल्या जात नसल्याने त्वचासंसर्ग व श्वासाच्या समस्यांनी कामगारवर्ग त्रस्त झाला आहे.पूर्व प्रभागात १४,१५,१६,२३ व ३० असे एकूण पाच प्रभाग आहेत. यामध्ये गांधीनगर, उपनगर, इंदिरानगर, जुने नाशिक, द्वारका, साईनाथनगर, विनयनगर, डीजीपीनगर क्र मांक एक हा परिसर येतो. पूर्व प्रभागांसाठी सुमारे ३० ते ४० घंटागाड्या असून त्यावर सुमारे ७० ते ८० कामगार काम करतात. या घंटागाड्या प्रभागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर केरकचरा गोळा करतात. घंटागाडीतील कामगार तसेच विनाहॅँडग्लोझ हातांनी ओला व कोरडा कचरा वेगळा करतात. तसेच सुमारे सात ते आठ तास त्या कचºयात उभे राहतात. हॅँडग्लोझ आणि तोंडाला मास्क नसल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ते घरोघरचा कचरा गोळा करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असून त्यांच्या आरोग्याची काळजी ठेकेदार का घेत नाही असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. त्यांच्या या मुलभूत सुविधांची तात्काळ दखल घेतली जावी अशी मागणी केली जात आहे.
नाशिकच्या ठेकेदारांनी घंटागाडी कर्मचा-यांना सोडले वा-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 3:11 PM