लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बद्रिनाथ, केदारनाथ तसेच गंगोत्री व यमुनोत्री दर्शनाच्या निमित्ताने उत्तराखंडच्या देवभूमीत पर्यटनाला गेलेले नाशिक सह औरंगाबाद, ठाणे जिल्ह्यातील भाविक तेथील भूस्खलनामुळे अडकून पडले असले तरी सुरक्षित असल्याची माहिती यातील काही भाविकांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीद्वारे दिली. नाशिकमधील चौधरी यात्रा, श्रीराम यात्रा व केसरी टूर्स या कंपन्यांद्वारे अनेक भाविक उत्तराखंडच्या धार्मिक आणि निसर्ग पर्यटनासाठी गेले आहेत. बद्रिनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथील जोशीमठ भागात शुक्रवारी (दि. १९) दुपारी भूस्खलन झाल्याने सुमारे १५ हजार भाविक अडकले होते. यात नाशिकच्या यात्रा कं पन्यांद्वारे गेलेल्या सुमारे सव्वादोनशे भाविकांचा समावेश आहे. भूस्खलनामुळे तेथील रस्ते बंद झाले असून, वाहतुकीची कोंडी झाली आहे. रस्त्यात सुमारे सहा ते सात ठिकाणी दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने यात्रा कंपन्यांनी भाविकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. बहुतेक जणांना जोशीमठापासून जवळ असलेल्या पिंपलकोटीपर्यंत सुरक्षितपणे हलविण्यात आले असून, रस्ता सुरू होईपर्यंत त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोयही करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत होईपर्यंत त्यांचा मुक्काम तेथेच वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्व भाविक सुखरूप आणि सुरक्षित असल्याची माहिती नाशिकच्या भाविकांनी दूरध्वनीद्वारे दिली. तसेच विविध यात्रा कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व भाविक सुखरूप असून, या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. यातील बहुतेक भाविक परतीच्या मार्गावर आहेत.
उत्तराखंडच्या भूस्खलनात अडकलेले नाशिकचे भाविक सुखरूप
By admin | Published: May 21, 2017 2:10 AM