नायगाव : कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथे पहिले शाहीस्नान केल्यानंतर नाशिक रामकुंडात स्नान करून परतीच्या प्रवासात बंगळुरूकडे निघालेल्या नाथपंथीय साधूंच्या झुंडीचे बुधवारी सकाळी सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात आगमन झाले. पायी निघालेल्या या नाथपंथीय साधूंच्या झुंडीचे नायगाव, जायगाव, देशवंडी व महादेवनगर येथील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. या नाथपंथीय साधूंच्या झुंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नानासाठी देशभरातून आलेले नाथपंथीय साधू त्र्यंबकेश्वर येथे एकत्र जमा झाले होते. दरबारा वर्षांनी ते त्र्यंबकेश्वर येथे एकत्र येत असतात. देशभरातून आलेल्या या नाथपंथीय साधूंमधून महंताची निवड करण्यात येते. त्यानंतर निवड झालेल्या महंतास गादीवर बसविण्यासाठी सर्व साधू बंगळुरूपर्यंत पायी प्रवास करून जातात. त्यानंतर निवड झालेल्या महंताचा बंगळुरू येथे राजतिलक कार्यक्रम संपन्न होतो. त्यासाठी सुमारे ५०० नाथपंथीय साधू बंगळुरूच्या दिशेने पायी मार्गस्थ झाले आहेत.या नाथपंथीय झुंडी सकाळी सायखेड्यामार्गे नायगाव येथे पोहचल्या. येथील महादेव मंदिरात ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना ग्रामस्थांच्या वतीने अल्पोपाहार व चहापाणी वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच इंदुमती कातकाडे, माजी सरपंच भाऊसाहेब लोहकरे, विक्रम कातकाडे, दिगंबर जेजूरकर, संजय भगत, गुलाब भांगरे, भारत जेजूरकर, रामभाऊ कदम, नारायण लेले, योगेश बैरागी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर जायगाव येथे ग्रामस्थांनी शाल व पुष्पहार देऊन नाथपंथीय झुंडीचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना फलाहार व ताक देण्यात आले. त्यानंतर महादेव मंदिर परिसरात अल्पोपाहार झाला. यावेळी मंदिराचे पुजारी रामकिसनगिरीजी महाराज यांच्यासह शंकर गायकवाड, कैलास काकड आदिंसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नाथपंथीय झुंडीच्या साधूंच्या सेवेसाठी यावेळी सरपंच नलिनी गिते, माजी उपसरपंच कैलास गिते, विलास गिते, भाऊसाहेब केदार, विक्रम दिघोळे, सचिन दिघोळे, अविनाश गिते, संभाजी गायकवाड, रघुनाथ दिघोळे, विठ्ठल गिते, पांडुरंग गिते, महादू गिते आदिंसह अनेक भाविक उपस्थित होते.
नाथझुंडीने वेधले नायगाव खोऱ्याचे लक्ष
By admin | Published: September 09, 2015 10:07 PM