नाशिक : दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये १९३८ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविताना केलेल्या भाषणाच्या स्मृतींना त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने उजाळा मिळाला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा शुक्रवारी (दि, २६) ५५ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांनी ८३ वर्षांपूर्वी केलेल्या भाषणात साहित्यापेक्षाही देशाच्या शस्त्रसज्जतेला आणि युवकांच्या सैनिकी शिक्षणाला दिलेले महत्व आजच्या काळातही किती उदबोधक आहे, त्याचा प्रत्यय त्यांच्या पुढील संपादित भाषणातून मिळतो.
‘राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्यचिंता, मुख्य साध्य असले पाहिजे. राष्ट्राच्या प्राणावरच बेतले असता केवळ साहित्याची कथा काय? आपल्या राष्ट्राची आजची मृत्युंजय मात्रा म्हणजे त्याचे शस्त्रबळच होय, साहित्य नव्हे ! जपानात प्रत्येक प्राथमिक शाळेत मुलामुलींना प्रथम सैनिकी शिक्षण सक्तीने देण्यात येते, अलंकारशास्त्राचे नंतर. आपले हे विस्तीर्ण भारतीय राष्ट्र आज जगतात निर्माल्यवत जे होऊन पडले आहे ते आपले साहित्य उणे म्हणून नव्हे- शस्त्रबळ उणे म्हणून! ही गोष्ट सगळ्या आधी, साहित्यिकहो, तुमच्या लक्षात आली पाहिजे! साहित्यिकवर्गच सर्वाधिक सुज्ञ, विज्ञ असणार! म्हणून सगळ्यात आधी तुम्ही गर्जून उठा की, आजच्या परिस्थितीत आमचे राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ ! शास्त्रचर्चा नव्हे! जे थोडे साहित्य हवे ते तुम्ही-आम्ही जे चाळिशीच्या वर गेलेले लोक, ते काय? ते हवे तर पुरवतील! जे तरुण. ज्या तरुणी, जी पाठीचा कणा ताठ असलेली पुढची पिढी त्या साऱ्यांना माझा या साहित्यपदावरून हाच निर्वाणीचा आदेश आहे की, राष्ट्रास आज साहित्यिक नकोत, सैनिक हवेत! जे राष्ट्र खुरटे, दुबळे त्यांचे साहित्यिक खुरटे नि दुबळेच असणार. ज्या दुबळ्या राष्ट्राला परक्यांची प्रबळ दारू आग लावते, त्याच्या साहित्यालाही कशी आग लागते ते तक्षशिलेला विचारा, नालंदेला विचारा’ असे सांगून त्यांनी देशाच्या संरक्षणसिद्धतेला प्राधान्य देण्यास सांगितले होते.
‘शिवरायांनी युगधर्म ओळखून सरस्वतीच्या रक्षणार्थच सरस्वतीकडे काही काळ पाठ फिरवून शुंभ-निशुंभ-मर्दिनीचीच उपासना केली, लेखणी टाकून भवानी उचलली म्हणून तर आज महाराष्ट्र सारस्वत असा काही पदार्थ जिवंत राहिला आहे! सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हास सांगतो की, साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक! पुढील दहा वर्षांत सुनीते रचणारा एकही तरुण नाही निघाला तरी चालेल, प्रत्यही साहित्य संमेलने न झाली तरी चालेल, पण दहा- दहा हजार तरुण सैनिकांचे वीरचमू संचलन करताना दिसले पाहिजेत. नगरानगरातून सैनिकी कॉलेजे गजबजलेली आढळली पाहिजेत. मग अधूनमधून त्यांनी एखादी कादंबरी वा प्रेमकथा वाचली वा सुनीत लिहिले तरी चालेल’. असे सांगून त्यांनी तत्कालीन तरुणांना शस्त्रशिक्षणासाठी प्रेरीत करताना साहित्यापेक्षाही देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याचेच दिसून येते.
फोटो - ( स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन विशेष)
२५ सावरकर २