नाशिक : पट्ट कादंब (बॅरहेडेड गूस), स्पूनबिल (चमचा), श्याम कादंब (ग्रे लॅग गूस), रंगीत करकोचा, राखी बगळा, जांभळा बगळा, नॉर्थन शॉवलर (थापट्या) यांसारखे असंख्य प्रजातीच्या बदक प्रकारातील स्थलांतरीत पक्ष्यांसह बगळे, करकोचे प्रकारातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर राष्ट्रीय पक्षी अभयारण्य गजबजले आहे. वाढत्या थंडीबरोबर या ठिकाणी भरलेले पक्षी संमेलनही उंची गाठत आहे. देशी-विदेशी पक्ष्यांच्या हजेरीने पक्षीप्रेमी पर्यटकांना आकर्षित केले आहे. यावर्षी सर्व प्रजातीच्या पक्ष्यांनी हजेरी लावली असून बहुतांश दुर्मीळ पक्षीदेखील पाणथळ जागेवर दाखल झाले आहेत.युरोप, रशिया, सायबेरिया अशा विविध देशांमधून पाहूणे स्थलांतरीत पक्षी नांदूरमधमेश्वरला दाखल झाले आहेत. नांदूरमधमेश्वर हे निफाड तालुक्यातील चापडगाव येथील पक्षी अभयारण्य आहे. दरवर्षी हिवाळ्यात या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्षी दाखल होतात. यावर्षी देखील जशी थंडीची तीव्रता वाढत आहे तशी पक्ष्यांची संख्याही वाढली आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने अवघे अभयारण्य दुमदुमून गेले आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या गणनेअंतर्गत २६ हजार ६१६ पक्ष्यांची नोंद झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांनी दिली आहे.
पक्षी गणेनअंतर्गत यांची झाली नोंदगढवाल, युरोशियन व्हिजन (तरंग), शॉवलर (थापट्या), रेड कस्टर्ड पोचार्ड (लालशिर), नयनसरी, पर्पल मोरहॅन (जांभळी पानकोंबडी), कॉमन पोचार्ड (चिमणशेंड्या), टफ्टेड पोचार्ड (शेंडी बदक), कॉमन क्रेन (करकोचा), पेंटेड स्टॉर्क (रंगीत करकोचा), स्पून बिल (चमचा-द्विर्मुखी), पट्ट कादंब, शाम कादंब, ग्रे-हेरान (राखी बगळा), पांढरा शराटी (व्हाईट आयबीज) या पक्ष्यांची नोंद वन-वन्यजीव विभागाकडून करण्यात आलेल्या पक्षी गणनेत करण्यात आली.
दुर्बिणीसह टेलिस्कोपची आणि पक्षी निरिक्षण मनोरे,गॅलरीची सुविधानांदूरमधमेश्वर बंधा-याच्या बॅकवॉटरच्या पाणथळ जागेत चापडगाव शिवारात राष्ट्रीय पक्षी अभयारण्य विकसीत केले गेले आहे. दरवर्षी हिवाळ्यात या ठिकाणी पक्ष्यांची गजबज पहावयास मिळते. देश-विदेशातून विविध प्रकारचे बदक, करकोच्यांसह बगळे येथे हजेरी लावतात. पक्ष्यांचा आनंद घेण्यासाठी येणा-या पर्यटक व पक्षीप्रेमींसाठी वन-वन्यजीव विभागाने येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर पक्षी निरिक्षण मनोरे, गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांना नाममात्र शुल्क आकारणी करत दुर्बीण, टेलिस्कोपदेखील पुरविले जातात. ज्यामुळे पक्षी निरिक्षण करणे सोपे होते. याबरोबरच पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, उद्यान या ठिकाणी उभारण्यात आले आहे. तसेच इको हटचीही सुविधा पर्यटकांना मुक्कामासाठी उपलब्ध आहेत. चापडगाव विकास समितीअंतर्गत वनविभागाने पक्षी निरिक्षण करुन त्यांचा अभ्यास करणारे काही स्थानिक युवकांना गाईड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सदर गाईड आलेल्या पर्यटकांना पक्ष्यांची ओळख करुन देत त्यांचे वैशिष्टयबाबत माहिती देताना दिसून येतात.