नाशिक : इंधन दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, महागाई कमी करावी यांसह विविध मागण्यांसाठी नाशिक तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने नाशिक तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसीलदार कार्यालयात तो नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नायब तहसीलदार अरुण शेवाळे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांपासून केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता गोरगरिबांची थट्टा केली असून, त्यामुळेच राष्टÑवादीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी करावी, लोडशेडिंग कमी करून शेतीचा व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा नियमित करावा, घोषणाबाज सरकारने शेतीमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी करावी, दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना पूर्ण कर्ज माफ करावे, तरुणांना रोजगार व नोक-या उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लवकरात लवकर द्यावी, वृद्धांच्या पेन्शन योजनेतील जाचक अटी कमी करण्यात याव्या, स्त्रियांवरील अत्याचार रोखण्याचे प्रयत्न करावेत आदी मागण्यात करण्यात आल्या. या आंदोलनात माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रेरणा बलकवडे, अर्पणा खोसकर, रत्नाकर चुंभळे, गणेश गायधनी, राजाराम धनवटे, योगेश निसाळ, दीपक वाघ, सोमनाथ म्हैसधुणे, रमेश कहांडळ, अशोक गायधनी, संजय कुटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महागाईच्या विरोधात राष्टवादीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 3:34 PM