वणी : सतत प्रकाशझोतात असलेल्या ९५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कासवगतीच्या कामामुळे वणी महाविद्यालय ते राका पेट्रोलपंपापर्यंतचा रस्ता एकेरी वाहतुकीचा झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून कोंडीमुळे एकमेकांना वाहने धडकणेव वाहनचालकांमध्ये वादविवादाचे प्रसंग घडत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे सुरळीत व सुलभ तसेच सुरक्षित वाहतूक होऊन दोन राज्यांचे दळणवळण सोयीचे होईल, अशी माफक व प्रामाणिक अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, रस्त्याच्या सुमार दर्जाच्या कामामुळे प्रारंभीपासूनच हा महामार्ग चर्चेत राहिला आहे. या मार्गावर निकृष्ट दर्जाचा रस्ता, काही ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रालगत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष यामुळे रस्त्यावर वाहने लागून वाहतुकीचे तीनतेरा वाजत आहेत. काही गावांच्या प्रवेश भागात असमान उंचसखल भाग तर काही ठिकाणी मार्गदर्शक सूचनांचा अभाव अशी अवस्था आहे. सद्य:स्थितीत वणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालय ते पिंपळगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या काही कालावधीपासून सुरू आहे. कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होणे नित्याचे बनले आहे. नाशिक, कळवण, पिंपळगाव, सुरगाणा या भागातून वणीत येणारी वाहने याच मार्गावरून येतात. त्यामुळे प्रचंड ताण वाहतुकीवर पडतो. वाहने निकृष्ट दर्जाच्या साईडपट्ट्यावरून चालवावी लागतात. या ठिकाणाहून पायी चालणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही.ठेकेदार सुस्त अधिकारी मस्तया रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार सुस्त तर अधिकारी मस्त आणि लोकप्रतिनिधी स्वस्थ अशा अवस्थेमुळे वाहनचालक व नागरिक अस्वस्थ झाले आहेत. शेकडो कोटी रुपये केंद्र सरकार या कामासाठी खर्च करत असताना दर्जेदार, टिकाऊ व वाहनचालकांसाठी सुरळीत महामार्ग व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांची आहे. परंतु, रस्त्याच्या कामासंदर्भात नियोजन नसल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 9:20 PM
वणी : सतत प्रकाशझोतात असलेल्या ९५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कासवगतीच्या कामामुळे वणी महाविद्यालय ते राका पेट्रोलपंपापर्यंतचा रस्ता एकेरी वाहतुकीचा झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून कोंडीमुळे एकमेकांना वाहने धडकणे
ठळक मुद्देवणी-सापुतारा : वाहतुकीची कोंडी, वाहनचालक त्रस्त