नाशिक : जागतिक आॅलिम्पिक दिनाच्या औचित्यावर राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धा शहरातील जुन्या आडगाव नाक्यावरील विभागीय क्रीडा संकुलात येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह २७ राज्यांचे ६५० खेळाडूंचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनचे सरचिटणीस अश्पाक शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत त्रिपुरा, मेघालय, नागालॅँड, मणिपूर, मिझोरम, आसाम यांसह २७ राज्यांचे ६५० खेळाडूंचे संघ वरिष्ठ व कनिष्ठ गटात स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा पुरुष व महिला खेळाडूंचा वरिष्ठ गटात संघ असून, त्यामध्ये नाशिकच्या मखमलाबाद येथील अनुराधा पिंगळे, राजश्री पिंगळे, अंजली पिंगळे, शीतल काकड यांचा महिला संघामध्ये सहभाग आहे. तसेच पुरुष संघामध्ये प्रशांत खैराते, सोमनाथ अहिरे या खेळाडूंचा सहभाग राहणार आहे.
शनिवारी राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धा जागतिक आॅलिम्पिक दिन : २७ राज्यांचे ६५० खेळाडूंचे संघ घेणार सहभाग
By admin | Published: June 17, 2015 1:53 AM