नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी दि. १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून, या संपाच्या शेवटच्या दिवशी दि. १० जून रोजी संपात सहभागी संघटनांनी ‘भारत बंद’चे आवाहन केले असून, या संपात नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार असल्याचा विश्वास संपाच्या राष्ट्रीय कोअर कमिटीचे सदस्य संदीप गिड्डे यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमधील हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (दि.२८) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गिड्डे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन करताना यावेळी होणारा देशव्यापी संप पूर्णपणे गनिमी कावा पद्धतीने केला जाणार असल्याचे सांगितले. या संपादरम्यान दि. १ जूनपासून शहरातील दूध व भाजीपाला पुरवठा रोखला जाणार असून, संपकाळात शहरातूनही काही खरेदी केली जाणार नाही. शेतकरी भाजीपाला बाजार समित्यांमध्ये न नेता थेट ग्राहकांना ६० रुपये प्रतिकिलो दराने तसेच दूध डेअरीमध्ये न नेता गावातच किंवा तालुक्याच्या ठिकाणी ५० रुपये लिटरप्रमाणे विकू शकतात, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गेल्यावेळी महाराष्ट्रात झालेल्या राज्यव्यापी संपात अनेक मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारितील नव्हत्या, त्यामुळे यावेळी देशव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागण्या मान्य करवून घेण्यासाठी लढा उभारण्यात येत आहे. या आंदोलनात देशभरातील २२ राज्यांतून शेतकरी सहभागी होणार आहे. जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंत शेतकºयांनी केलेले हे पहिलेच आंदोलन असून, राष्ट्रीय किसान महासंघाच्या १३० व किसान एकता मंचच्या ६० अशा १७० संघटना या देशव्यापी लढ्यात उतरणार असल्याचे गिड्डे यांनी सांगितले.
राष्ट्रीय किसान महासंघाचा १ जूनपासून देशव्यापी संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:30 AM