नाशिक : नाशिकमध्ये २०१४-१५साली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीच्या काळात यशस्वीरित्या चोख पोलीस बंदोबस्त ठेवत पर्वणी पार पाडल्याबद्दल तत्कालीन नाशिकचे पोलीस आयुक्त तथा विद्यमान अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.जगन्नाथन यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तसेच नाशिकचे माजी सहायक आयुक्त रवींद्र वाडेकर, माजी वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाजीराव भोसले व शांताराम अवसरे यांनाही राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे.पोलीस दलामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदकाचा बहुमान नाशिकमध्ये कामगिरी बजावल्याच्या जोरावर तीघा अधिका-यांना मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर त्यांच्या सध्याच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत पालकमंत्र्यांच्या हस्ते जाहीर सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. जगन्नाथन यांनी कुंभमेळ्याचे यशस्वी पोलीस बंदोबस्तासह ‘मैत्रेय’ सारख्या आर्थिक घोटाळ्यात लाखो ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी न्यायालयाकडे अत्यंत कौशल्याने पाठपुरावा करून न्यायालयीन आदेशानुसार प्रथमच ‘एस्क्रो’ बॅँक खात्याची निर्मिती करण्यास यश मिळविले होते. तसेच ‘केबीसी’घोटाळ्याचा सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण याच्याही अटकेसाठी त्यांनी आपले कौशल्य पणाला लावून सिंगापुरमधून मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्या एकूण कामगिरीची केंद्रीय व राज्याच्या गृह विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रपती पदक देऊन शुक्रवारी (दि.२६) गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच नाशिकचे परिमंडळ एकचे तत्कालीन सहायक आयुक्त व सध्या ठाण्यात सहायक आयुक्त पदावर असलेले रवींद्र वाडेकर यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक व सध्याचे ठाणे येथील सहायक आयुक्त शांताराम अवसरे व बाजीराव भोसले यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. भोसले यांनी भद्रकाली, पंचवटी पोलीस ठाण्यात सेवा बजावताना गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा केलेला प्रयत्न व विविध गुन्हेगारांच्या आवळलेल्या मुसक्यांची दखल गृह विभागाकडून घेण्यात आली आहे.
ठाणे येथील सहायक आयुक्त बाजीराव भोसले