नाशिक : ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना केंद्र पातळीवरून गुंडाळली जाण्याची शक्यता असून, यापुढे या योजनेतील कोणत्याही पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देऊ नये, तसेच प्रगतिपथावरील पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ण करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी पत्र पाठविले आहे. प्रधान सचिवांच्या या पत्रामुळे राज्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत नव्याने मंजूर करावयाच्या पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य अधांतरी सापडण्याची शक्यता असून, एकट्या नाशिक जिल्'ाचा विचार केला, तर मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या १७३ पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत. प्रधान सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून, जिल्'ातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील प्रगतिपथावर असलेल्या योजना तत्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही करून तसा अहवाल तत्काळ विभागास पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल पाणीपुरवठा योजनांबाबत केंद्र पातळीवरून निधीच्या उपलब्धतेबाबत आवश्यक ते मार्गदर्शन अथवा नियोजन प्राप्त झालेले नसल्याने नव्याने कोणत्याही पाणीपुरवठा योजना मंजूर करू नयेत, असे कळविले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य धोक्यात सापडले आहे.(प्रतिनिधी)
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गुंडाळणार
By admin | Published: May 26, 2015 1:38 AM