कळवण : तालुक्यातील वीज, पाणी व रस्त्यांसह इतर कामांची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी राष्टवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था ढासळली असून, वीज पुरवठा सुरळीत करा, कनाशी-हतगड रस्त्यासह रस्त्यांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करा, सुळे उजवा व डाव्या कालव्याला व चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडावे या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सभापती आशा पवार, उपसभापती विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देऊन दोन तासानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. कळवण तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा व निर्माण झालेल्या समस्यांसंदर्भात मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता टेंभुर्णे यांनी दिले तर सुळे उजव्या व डाव्या कालव्याला तसेच चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करून आदेशान्वये पाणी सोडण्याचे आश्वासन अभियंता मुसळे व चौधरी यांनी दिले. कनाशी ते हतगड रस्त्यासंदर्भात शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला असून, तालुक्यातील रस्ते दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन सहाय्यक अभियंता आदित्य भोसले यांनी दिल्यानंतर आंदोलकन मागे घेण्यात आले. पाणी असून विजेअभावी शेतपिकांना पाणी देता येत नाही. वीज ग्राहक वीजबिल भरणा नियमित करीत असूनसुद्धा वीज नियोजित वेळेनुसार नियमित मिळत नाही. अवघे दोन तासपण अनियमित वीजपुरवठा मिळतो. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नुकसान होत आहे. मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याकडे बैठकीत प्रश्न मार्गी लागले नाहीतर तर आंदोलन करावे लागेल. - जयश्री पवार, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदशेतीला लागणारे पाणी हे विजेवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने सातत्याने होणारे भारनियमन व विजेच्या खेळखंडोबामुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वीज ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत न मिळता केव्हाही येते आणि केव्हाही जाते. - रमेश पवार, सरपंच, दळवट
राष्टवादी काँग्रेसच्या वतीने दोन तास ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:40 PM