नाशिक : शिखर बॅँकेच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून ईडीने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई नाका येथे निदर्शने केली. युती सरकारने राजकीय सुडातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांबरोबर मंगळवारी ईडीने शरद पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने त्याच्या निषेधार्थ दुपारी राष्टÑवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत राष्टÑवादी भवन येथे युती सरकार व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. शरद पवार हे राज्य सहकारी बॅँकेचे कधीही संचालक नव्हते तसेच ते राज्यातील इतर कुठल्याही सरकारी बँकेमध्ये संचालक अथवा बँक प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्येदेखील सहभागी नव्हते.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्यात फिरत असून, त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्यानेच ईडीच्या आडून सरकारने गुन्हा दाखल केल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. सदरच्या निदर्शने आंदोलनात जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ईडीच्या निषेधार्थ राष्टवादीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:04 AM