सटाणा : येथील नगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोमवारी रात्री उशिरा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्ह्याचे प्रभारी सुनील बागुल यांच्या उपस्थितीत पक्षांतर केला आहे. सटाणा सोमवारी रात्री नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्ह्याचे प्रभारी सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शंकर वाघ, पक्षनिरीक्षक नंदकुमार खैरनार, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्या उपस्थितीत सुमारे ८४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, डॉ. संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, समकोचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे, साहेबराव सोनवणे आदि उपस्थित होते.सोमवारी रात्री अचानक जिल्ह्यातील भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत सोनवणे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी पुष्पहार घालून सोनवणे यांचे स्वागत केले. त्यांनतर राष्ट्रवादीच्या नगरसेवक मंदाकिनी सोनवणे यांचे सुपुत्र संजय सोनवणे यांनीदेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणता उमेदवार सक्षम राहील यासाठी एका बंद दरवाजात एकेकाचे मत जाणून घेतले. याबाबतचा अहवाल निवड समितीकडे सादर करणार असल्याचे बागुल यांनी सांगितले. तसेच एका खासगी कंपनीतर्फेदेखील नगरसेवक व अध्यक्षपदाच्या उमेदवारांचा सर्व्हे करण्यात आला असून, त्याचाही विचार निवड समिती करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
सटाण्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश
By admin | Published: October 25, 2016 11:27 PM