नितीन बोरसे सटाणाबागलाण तालुक्यातील वीरगाव गट व गण हे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने येथे साहजिकच महिला राज येणार आहे. भाजपाचा हक्काचा हा गट गेल्या दशकापासून कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराने रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने येथे पंचरंगी सामना रंगण्याची चिन्ह दिसत असले तरी खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येच दिसून येत आहे.वीरगाव गट, कंधाणे गण, वीरगाव गण या निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याने अनेक मातब्बरांचा हिरमोड होऊन त्यांना सोयीस्कर गट शोधावा लागला आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील हे या गटाचे नेतृत्व करत होते. हा गट राखीव झाल्याने प्रा. पाटील यांनी ठेंगोडा गटात पत्नी सारिका यांना उमेदवारी देऊन उतरविले आहे. हा गट तसा भाजपाचा बालेकिल्ला परंतु गेल्या दहा वर्षांपूर्वी कॉँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील यांनी पत्नी संगीता यांना मैदानात उतरवून हा गट हस्तगत केला होता. गेल्या निवडणुकीतही कॉँग्रेसचे प्रा. पाटील यांनी हा गड राखला. या निवडणुकीत हा गट राखीव झाला असला तरी तिकिटासाठी अंतिम क्षणी अनेक राजकीय उलथापालथ झाल्याचे बघायला मिळाले. भाजपाने गेलेला गट मिळविण्यासाठी इलेक्टिव्ह मेरिटचा आग्रह धरून आदर्श गाव किकवारी खुर्दच्या सरपंच मंजुळाबाई कैलास जहागीरदार (सोनवणे) यांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र ऐनवेळी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गट हस्तक्षेप करून जहागीरदार यांचे तिकीट कापून शिवसेनेच्या कार्यकर्त्या व खासदार चव्हाण यांची भाची साधना गवळी यांना उमेदवारी बहाल केली. चव्हाण यांच्या जातीय राजकारणामुळे सुमारे साडेचौदा हजार भिल्ल समाजाचे मतदार जहागीरदार यांचे तिकीट कापल्यामुळे नाराज झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. तिकीट कापल्यामुळे जहागीरदार यांच्यासारखा मोठा उमेदवार शिवसेनेच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादी र्कांग्रेसमध्येही असेच महाभारत घडले. पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य वीरेश घोडे यांनी पत्नी वंदना यांना उमेदवारी मिळविण्यासाठी सुरुवातीला भाजपाकडून प्रयत्न केले; मात्र तेथे घोडेंची नाकाबंदी केल्याने त्यांनी तत्काळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही परतले आणि तिकिटासाठी दावेदारी केली; त्यांना ज्याची भीती होती तेच घडले. येथेही त्यांचे तिकीट कापून व्यक्तिगत दुश्मनी काढल्याचा घोडे यांचा आरोप आहे. राष्ट्रवादीने घोडे यांना उमेदवारी नाकारून जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापती व देवळ्याचे रहिवासी उषा बच्छाव यांना आयात करून उमेदवारी बहाल केली.
राष्ट्रवादी-सेनेत काट्याची टक्कर
By admin | Published: February 10, 2017 11:08 PM