नाशिक : गोरगरीब जनतेच्या रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा, याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. परंतु पीओस मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, रेशन दुकानावर स्वस्त धान्य घेण्यासाठी गरीब जनतेला प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांचा पाढा वाचत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शरद कोशिरे, निवृत्ती अरिंगळे, अशोक सावंत, संजय खैरनार, अशोक पाटील मोगल, मनोहर बोराडे, बाळासाहेब मते यांनी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. रेशन धान्य दुकानातील धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, स्वस्त धान्य घेणाºया गरीब जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गरीब कुटुंबातील रेशन कार्डधारकांची नावे आधार कार्ड देऊनही लिंक न झाल्याने तसेच काहींच्या बोटांचे ठसे मशीनशी जुळत नसल्याने रेशन धान्य दुकानदार त्यांना धान्य देत नाही. त्यामुळे गरीब जनतेला पोटाला चिमटा देत जीवन जगावे लागत आहे. तसेच स्वस्त धान्य घेणाºया नागरिकांमध्ये मोलमजुरी व धुणीभांडी करणाºया महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले आहेत. त्यांच्या बोटांचे ठसे पीओएस मशीनमध्ये येत नसल्याने संबंधित अधिकारी येईपर्यंत नागरिकांना चार-चार तास रेशन दुकानांसमोर ताटकळत उभे रहावे लागत असल्याने त्यांचा दिवसाचा रोजगार बुडत आहे. पीओएस मशीनवर बहुतांशी कार्डधारकांची नावेच नाहीत, तर ज्यांची नावे आहेत त्यांच्या बोटांचे ठसे मशीनमध्ये जुळत नाही. त्यातच मशीनला अनेकदा नेटवर्क मिळत नसल्याने गोरगरिबांना स्वस्त धान्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. तसेच गरीब जनतेला या पद्धतीने धान्य घेताना काही अडचणी येऊ नये व आल्यास त्या सोडविण्याकरिता अधिकाºयांची नेमणूक केली आहे. मात्र हे अधिकारी कुठेच फिरताना दिसत नसल्याने व जनतेला यातील काही माहिती नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यावेळी जयप्रकाश गायकवाड, अॅड. चिन्मय गाढे, मकरंद सोमवंशी, राजेश जाधव, प्रफुल्ल पाटील, नवराज रामराजे, संतोष भुजबळ, मुन्ना अन्सारी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.