येवला : नव्याने आलेल्या घरपट्टीत तब्बल ४० टक्के वाढ केल्याचे दिसत असून हि करवाढ अन्यायकारक आहे. पालिकेकडून आकारण्यात आलेल्या घरपट्टीच्या तुलनेत शहरात मुलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे वाढीव कराचा बोजा येवलेकरांवर परवडणारा नसल्याने सदर घरपट्टी कमी करण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना देण्यात आले.शहरातील रहिवाशांना येवला नगरपालिकेकडून वाढीव घरपट्टी बाबत नोटीस देण्यात आलेली आहे. त्यानुसार घरपट्टीत सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. मात्र शहरात मुलभूत सुविधांची वानवा आहे. तसेच यामध्ये पायखानाकर देखील लावण्यात आला आहे. पूर्ण घराचे मोजमाप करून कर आकारणी केली जाते त्यामुळे पायखाना कराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. वृक्षलागवड हि राज्यशासनाची संकल्पना असून त्यासाठी कर आकारणीची गरज नाही. नगरपालिकेच्या मालकीची एकही शाळा शहरात नाही. त्यामुळे शिक्षण कर घेण्याचा नैतिक अधिकार नगरपालिकेला नाही. तसेच केंद्र व राज्य सरकार स्वच्छता अभियान राबवीत असून त्या अनुषंगाने स्वच्छतेवर खर्च करत आहे. त्यामुळे स्वच्छता कर देखील आकारता येणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून करवाढ मागे घेऊन शहरवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, प्रवीण पहिलवान, सुभाष गांगुर्डे, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, प्रवीण बनकर आदीसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.
अन्यायकारक घरपट्टी कमी करण्याची राष्ट्रवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 6:16 PM
येवला : मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
ठळक मुद्देपूर्ण घराचे मोजमाप करून कर आकारणी केली जाते त्यामुळे पायखाना कराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.