नाशिक : केंद्र सरकारने देशातील बँकांचे विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली असून या प्रक्रियेला देशभरातील विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांसह बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवित एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपाच्या माध्यमातून नाशिकमध्ये टिळकपथ येथील बँकेच्या शहर कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त करण्यासाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया संघटनांच्या माध्यमातून मंगळवारी (दि.२२) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला असून या माध्यमातून संघटनेच्या नाशिक शाखेतील कर्मचाऱ्यांनी बँक विलीनीकरण व खासगीकरणाला विरोध केला आहे. बँक कर्मचाऱ्यांनी या संपाच्या माध्यमातून बँकांमधील कर्मचाऱ्यांची नोकरी असुरक्षीत झाल्याचे सांगत सरकारकडून वारंवार बँकींग क्षेत्रातील नोकऱ्यांवर हल्ले होत असल्याचा अरोप करतानाच सरकारने बँकींग क्षेत्रातील नोकरीच्या सुरक्षिततेवरील हल्ले थांबविण्याची मागणी केली. तसेच या क्षेत्रातील रिक्त जागांवर तत्काळ नोकर भरती करून सेवा शुल्कात सातत्याने होणारी वाढ थांबविण्याची आणि थकीत व एनपीए झालेल्या कर्जाची वसुली करण्याची मागणी बीआयबीईए आणि बीईएफआय या संघटनांनी केली आहे. या आंदोलनात बँक कृती समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्रचे सचीव शिरीष धनक यांच्यासह के. एफ. देशमूख, अदित्य तूपे, अशोक डोईफोडे, मनोज जाधव, मंगेश रोकडे, संतोष कागळे आदींनी सहभाग घेत सरकारविरोधात घोषणाबाजी करून बँकांच्या विलनाीकरणाला जोरदार विरोध केला.