मांगीतुंगी : येथील भगवान वृषभदेव मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशीही शनिवारी (दि.२०) अभिषेकासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. शुक्रवारच्या दिवसाचे वैशिष्ट म्हणजे नाशिक जिल्ह्यातील अन्य धर्मीयांनीदेखील दर्शनासाठी गर्दी केल्याने मांगीतुंगीला कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साठ ते सत्तर हजार भाविकांनी शुक्रवारी दर्शन घेतले असल्याचा प्रशासनाचा अंदाज असून, आज रविवारी सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे.जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान वृषभदेवांची सर्वाधिक उंच १०८ फूट अखंड पाषाणात कोरलेली मूर्ती ही जगात एकमेव असल्याचा दावा मूर्ती निर्माण समितीने केला आहे. त्यामुळे या मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यालादेखील मोठे महत्त्व प्राप्त होऊन भाविक आणि पर्यटकांसाठी हे तीर्थस्थळ आकर्षण बनले आहे. प्राणप्रतिष्ठापणाचा विधी पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी ह्या विशालकाय मूर्तीचे भाविकांसाठी लोकार्पण करण्यात आले. मूर्ती निर्माण समितीने देशातील तमाम जैन भाविकांना मूर्ती अभिषेकाचे पुण्य पदरी पडावे म्हणून वेळ आणि दिवस ठरवून पूजेसाठी सर्व सोय करून देण्यात आली आहे. या अभिषेकसाठी भाविकांच्या गर्दीत आता दररोज भरच पडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशी देशभरातील दहा ते बारा हजार जैन भाविकांनी णमोकार मंत्रोचाराने अभिषेक करून भगवान वृषभदेवांचा जयघोष केला. अभिषेक करणाऱ्या इंद्र-इंद्राणी बरोबरच नाशिक जिल्ह्यातील अन्य धर्मीयांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवारच्या हाफ डेचा फायदा घेत सुमारे साठ ते सत्तर हजार भाविकांनी मांगीतुंगीत हजेरी लावली असल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे. (वाार्ताहर)
मांगीतुंगीला कुंभमेळ्याचे स्वरूप
By admin | Published: February 20, 2016 10:27 PM