पंचवटी बाजार समितीला पोलीच छावणीचे स्वरूप
नाशिक : येथील पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा सकाळी तैनात करण्यात आल्याने बाजार समितीला जणू पोलीस छावणीचे स्वरूप पहावयास मिळत आहे. सकाळी काही कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती. यानंतर पोलिसांनी धाव घेत प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. राज्य राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. विनापरवाना कोणालाही बाजार समितीच्या आवारात निदर्शने करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कुठल्याहीप्रकारे निदर्शने विनापरवानगीने केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे बाजार समितीत शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शेतकरीराजा आज बाजार समितीकडे फिरकलाच नाही, यामुळे बाजार समितीत निरव शांतता पसरलेली पहावयास मिळत आहे. दरम्यान, बाजार समितीच्या आवारात निदर्शने वगैेरे होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यासह स्ट्रायकिंग फोर्स, राज्य राखीव दलाच्या काही जवानांनाही येथे पाचारण करण्यात आले आहे.
----
द्वारका चौफुलीवरही फौजफाटा
शहरातील मुख्य वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जाणाऱ्या द्वारका येथील चौफुलीवर सकाळपासून पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. द्वारका चौफुली येथे रास्ता रोको करण्याची काही संघटनांनी तयारी केल्याची कुणकुण पोलिसांना लागल्यामुळे पोलिसांनी याठिकाणी वेळीच धाव घेत बंदोबस्तामध्ये वाढ केल्याचे चित्र पहावयास मिळाले. द्वारका चौकात नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे या दोन राष्ट्रीय महामार्गांसह नाशिक शहरातील लहान-मोठे असे एकूण १७ रस्ते एकत्र येतात. यामुळे या चौकात जर कुठल्याही कारणाने वाहतुकीचा खोळंबा झाला तर त्याचा ताण शहरातील अन्य चौकांमध्येही पहावयास मिळतो. यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.