येवला : तालुक्यातील पुरणगाव येथे विश्वकल्यासाठी नऊ दिवसांचा नऊकुण्डीय श्रीराम महायज्ञ सोहळा झाला. या सोहळ्यासाठी रामचरितमानसचे ११ महिने ११ दिवस अखंड १०८ पारायणे करण्यात आली. पूर्णाहुती सोहळ्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात, राजस्थान राज्यातून विविध मठांचे संत-महंत उपस्थित होते. या यज्ञासाठी वैष्णवदास महाराज धुळे यांचे मार्गदर्शन लाभले. सियाराम महाराज (अकोला), रामायणाचार्य सहजानंद महाराज, यज्ञाचार्य पंडित बुद्धिप्रकाश शास्त्री (जयपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत यज्ञ सोहळा पार पडला. गेली ११ महिने ११ दिवस दररोज पंचक्रोशीतील नागरिक पारायणासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत होते. पूर्णाहुतीनिमित्त झालेल्या ध्वजारोहणास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अंबादास बनकर, पंचायत समिती माजी सभापती संभाजीराजे पवार उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली. प्रहार अपंग जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांची उपस्थिती होती. यावेळी हरिभाऊ महाजन, रावसाहेब ठोंबरे, सुधाकर ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे, विकास ठोंबरे, किरण चरमळ, नारायण ठोंबरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुरणगावला विश्वकल्यासाठी नऊकुण्डीय महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:12 AM