सावाना ग्रंथालय सप्ताहनाशिक : तब्बल साठ वर्षे सिनेमासृष्टीची सेवा करत भारतीय चित्रपटांच्या संगीताला ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांनी दिशा दिली. त्यांच्या अजरामर संगीतामुळे अनेक चित्रपट गाजले, असे प्रतिपादन नौशाद अली यांचे मराठीत आत्मचरित्र लिहिणारे शशिकांत किणीकर यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने औरंगाबादकर सभागृहात सुरू असलेल्या ग्रंथालय सप्ताहात सोमवारी (दि.१७) किणीकर यांनी ‘दास्तान-ए-नौशाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीतकार नौशाद अली यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सुरुवातील नौशाद अली यांच्या खडतर व संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर त्यांच्या चित्रपटसृष्टीमधील योगदानाचा आढावा घेण्यास सुरुवात केली.सर्वप्रथम नौशाद यांना आपल्या संगीताची जादू दाखविण्याची संधी मिळाली ती १९४० च्या ‘प्रेमनगर’ चित्रपटातून. ‘स्टेशन मास्टर’ या चित्रपटानंतर संगीत दिग्दर्शक म्हणून नौशाद नावारूपाला आले. ‘नई दुनिया’नंतर त्यांनी १९४२ साली सरदार मलिक यांनी नौशाद यांना सोबत घेत त्यांची संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या संस्थेत नियुक्ती केली. नौशादजींच्या संगीतामुळे दिग्दर्शक बी. आर. चोपडा यांचा ‘कानून’ चित्रपट प्रेक्षकांनी त्यावेळी डोक्यावर घेतला.यावेळी पलट तेरा ध्यान किधर हैं..., जब दिल ही तुट गया..., क्या मील गया भगावान मेरे दिल को दुखा के... यांसारखी नौशाद यांची संगीत लाभलेली अजरामर गीते आणि त्यामागील कथाही किणीकर यांनी यावेळी सादर करत नौशाद यांनी केलेल्या चित्रपट संगीताच्या सेवेचा मागोवा घेतला.जेव्हा १९८१ साली अभिनेत्री नुरजहां या मुंबईत एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांनी नौशाद अली यांच्या संगीताची स्तुती करत चित्रपट ‘अनमोल घडी’मधील ‘क्या मिल गया भगवान...’ हे गीत मला खूपच भावल्याचे सांगत ते गायलेही होते, असे किणीकर यांनी यावेळी सांगितले. अभिनेता व गायक कुंदनलाल सहगल यांच्यासोबत नौशादजी यांनी काम केले. सहगल यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी ‘जब दिल ही तूट गया...’ हे गीत वाजविण्यात आले होते, अशी आठवणही किणीकर यांनी यावेळी सांगितली.
चित्रपट संगीताला दिशा देणारे ‘नौशाद’: शशिकांत किणीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:20 AM