नाशिक : यावर्षी नवरात्रोत्सवात प्रतिपदापासून दशमीपर्यंत तिथींबाबत संभ्रमावस्था निर्माण करणारी स्थिती असतानाच नवमी आणि विजयादशमी एकाच दिवशी आल्याने नवमीच्या उपवासाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंचांगकर्त्यांसह धर्मशास्त्र अभ्यासकांनी मात्र, नवमी व विजयादशमी एकाच दिवशी येत असली तरी नवमी तिथी बुधवारी (दि.२१) दुपारी १.३० वाजेपासून ते गुरुवारी (दि.२२) दुपारी ११.५९ वाजेपर्यंत असल्याने नवमीचे उपवास बुधवारी करण्याचे आणि नवरात्रोत्थापन व पारणा गुरुवारी दुपारपर्यंत करण्याचे स्पष्ट केले आहे. येत्या गुरुवारी (दि.२२) विजयादशमी साजरी केली जाणार आहे. नवरात्रोत्सवात उपवास, व्रत-वैकल्यांना अतिशय धार्मिक महत्त्व आहे. यंदा नवरात्रोत्सवाची धूम दहा दिवस आल्याने तिथीबाबतही भाविकवर्गात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजेनंतर अष्टमी तिथीला प्रारंभ झाला. त्यामुळे देवीपुढे घागरी फुंकण्याचा कार्यक्रम बव्हंशी ठिकाणी रात्रीच करण्यात आला. बुधवारी (दि.२१) दुपारी १.३० वाजेपर्यंत अष्टमी असून, त्यानंतर नवमी तिथी सुरू होणार आहे. त्यामुळे अष्टमीचे होम-हवन दुपारपर्यंत करण्यात यावे, असे धर्मशास्त्र अभ्यासकांनी म्हटले आहे.
नवमी-विजयादशमी एकाच दिवशी
By admin | Published: October 20, 2015 11:29 PM