नाशिक : नवरात्रौत्सवानिमित्त परिसरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या दांडिया रास आयोजनामुळे दररोज देवीचा जागर होतअसून, त्याला महिला, तरूणी, तरूणांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सायंकाळ होताच दांडिया प्रेमींचे जत्थे राणेनगर, चेतना नगर, वासन नगर, सुचीता नगर येथील नवरात्रोत्सव मंडळांमध्ये दाखल होत आहेत.युनिक ग्रुपच्यावतीने युनिक मैदानावर यंदाही फक्त महिलांसाठी दांडिया रास आयोजन करण्यात आले असून, ज्या महिला टवाळखोरांच्या त्रासामुळे दांडियासाठी घराबाहेर निघत नाही त्यांची या ठिकाणी गर्दी होत असून, मंडळाच्यावतीने दररोज बेस्ट कपल, बेस्ट ग्रुप, आकर्षक वेशभूषा यासाठी बक्षीसांचे वाटप केले जात आहे. हुल्लडबाजी टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहे. नगरसेवक सतीश सोनवणे अनिता सोनवणे व दीपक आव्हाड यांनी आयोजनक केले आहे.इंदिरानगर येथे भाजपप्रणीत प्रगती महिला मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच महिलांसाठी दांडिया रास आयोजन नगरसेवक डॉ दीपाली कुलकर्णी यांनी केले आहे. याठिकाणीही दररोज बेस्ट कपल, बेस्ट ग्रुप साठी बक्षिसांचे वाटप केले जात असून, युवती व महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चेतना नगर येथे सालाबादप्रमाणे बाजीराव फाउंडेशनच्या वतीने नगरसेवक पुष्पा आव्हाड व साहेबराव आव्हाड यांनी दांडिया रास चे आयोजन केले आहे. वासन नगर परिसरात गामने मळा येथे मुरली फाऊंडेशनच्या वतीने रवींद्र गामणे यांनी दांडिया रास आयोजन केले आहे. सुचीता नगर येथील सुचीता नगर मित्र मंडळ व वासन नगर येथील श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या दांडिया रास ला दांडिया प्रेमींचा ही उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे इंदिरानगर परिसरात नवरात्रौत्सवात मोठ्या प्रमाणावर धार्मिक वातावरण तयार झाले असून, रात्री उशिरापर्यंंत अबाल, वृद्ध त्यात सहभागी होत आहेत.