नाशिक : आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच शनिवारपासून (दि. १) नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून ग्रामदेवता असलेल्या भद्रकाली देवी मंदिर, सांडव्यावरची देवी तसेच कालिका देवी मंदिरासह शहरातील विविध देवी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनीही दांडिया आणि गरब्यासाठी तयारी केली आहे.नवरात्रोत्सवाला श्राद्ध समाप्त होण्याच्या दुसऱ्याच दिवशी सुरुवात होत असल्याने कालपर्यंत मंदावलेल्या बाजारात अचानक उत्साह संचारला आहे. तर उत्सवकाळात शहरात कालिकामंदिर परिसरात यात्रोत्सवालाही रंग भरणार आहे. त्यासाठी मंदिर ट्रस्टने पूर्ण तयारी केली असून या भागात रहाट पाळण्यांसह विविध प्रकारच्या खेळणी व पूजा साहित्याची दुकाने लावण्यात आली आहे. यावर्षी १० दिवसांचा नवरात्रोत्सव असून ११ आॅक्टोबरला दसरा आहे. नवरात्रीत विविधरंगी कलाकुसर असलेल्या टिपऱ्यांसह गुजराथी व राजस्थानी वेशभूषा, नाशिककरांना पाहायला मिळणार आहे. युवा वर्गाकडून हे पास मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. अनेकांनी गेल्या महिनाभरापासून दांडिया आणि गरब्याच्या शिकवण्या केल्या असल्याने कधी टिपरीवर टिपरी पडेल आणि रासलीला रंगेल याविषयी तरुणाईमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) गुजराथी शैलीच्या कपड्यांना मागणीनवरात्रोत्सवात घागरा-चोळी, पंजाबी ड्रेस, साडी घालून गरबा खेळणे मुली पसंत करतात. यासाठी नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घातले जातात. त्यामुळे दरवर्षी या कपड्यांमध्ये काहीना काही बदल करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न व्यापारी करत असतात. मुलांसाठी असलेल्या पारंपरिक गुजराथी शैलीच्या पगडी आणि धोतीलाही बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
आजपासून नवरात्रोत्सव
By admin | Published: October 01, 2016 1:33 AM